पिंपळसुटी येथे पिकअप पलटून तिघे जखमी; भरधाव वाहनचालकाविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा

शिरूर, प्रतिनिधी : रमेश बनसोडे 

शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी परिसरात गुरांच्या बाजारासाठी जात असताना महिंद्रा पिकअप वाहनाचा भीषण अपघात होऊन तिघेजण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्हावरा येथील शेतकरी आबू संभाजी पवार (वय 48) हे आपल्या भावासह व मुलासोबत म्हैस विक्रीसाठी काष्टी येथील गुरांच्या बाजारात जात होते. त्यासाठी त्यांनी आमीन अबूभाई शेख यांच्या मालकीची महिंद्रा पिकअप (क्र. एमएच-12 डीटी-1138) वापरली होती.

27 जून 2026 रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास पिंपळसुटी गावाच्या हद्दीतून जात असताना चालकाने वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालविल्याने त्यावरील ताबा सुटला. त्यामुळे पिकअप रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी होऊन जागेवरच फिरली आणि न्हावराच्या दिशेला थांबली.

या अपघातात फिर्यादी आबू पवार यांच्या डोक्याला, डाव्या गुडघ्याला, मणक्याला व छातीला दुखापत झाली. त्यांचे भाऊ छबू पवार यांनाही मार लागला. तर मुलगा निलेश आबू पवार याच्या तोंडाला गंभीर दुखापत होऊन एक दात पडला असून दोन्ही हात, छाती, गुडघा व कंबरेला देखील दुखापत झाली आहे. अपघातात पिकअप वाहनाचेही नुकसान झाले.

या घटनेप्रकरणी आबू संभाजी पवार यांच्या फिर्यादीवरून चालक आमीन अबूभाई शेख, रा. न्हावरा, ता. शिरूर याच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खाबाले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *