निमोणे (ता. शिरूर) : शेतात काम सुरू असताना झालेल्या वादातून सात जणांविरुद्ध गर्दी करून मारहाण, धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत ६४ वर्षीय शेतकरी जखमी झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माणिक प्रल्हाद जाधव (वय ६४, रा. निमोणे, ता. शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शरद चंदर काळे, अक्षय भरत काळे, भरत भाऊसाहेब काळे, कैलास भाऊसाहेब काळे, राजेंद्र भाऊसाहेब काळे, तेजस भरत काळे आणि तन्मय राजेंद्र काळे (सर्व रा. निमोणे, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही घटना ७ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास निमोणे गावाच्या हद्दीतील शेत परिसरात घडली. फिर्यादी आपल्या शेतात काम करत असताना काही जण पोकलेन आणि हायवा घेऊन माती भरण्यासाठी जात असल्याचे दिसले. यावेळी फिर्यादी यांनी संबंधितांना वाहने कुठे घेऊन जात आहात, अशी विचारणा केली. या प्रश्नावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीनुसार, वादानंतर आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत खाली पाडले. त्यानंतर एका आरोपीने दगडाने उजव्या डोळ्याजवळ मारहाण केली, तर दुसऱ्या आरोपीने बांबूच्या काठीने पाठीवर वार करून दुखापत केली. तसेच इतर आरोपींनी हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी ८ जुलै २०२६ रोजी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेत वापरलेले दगड व बांबूची काठी अद्याप जप्त करण्यात आलेली नाही. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करत आहेत.
पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.




