गर्भलिंग निदान-स्त्रीभ्रूणहत्या रॅकेटप्रकरणी तपासाला वेग; डॉक्टरसह दोघांना १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

गर्भलिंग निदान-स्त्रीभ्रूणहत्या रॅकेटप्रकरणी तपासाला वेग; डॉक्टरसह दोघांना १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

प्रतिनिधी – योगेश राऊत

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान व स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपासाची व्याप्ती वाढवत आणखी दोन प्रमुख आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका डॉक्टरचा समावेश असून, न्यायालयाने दोन्ही आरोपींना १ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (पीसीआर) सुनावली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण रॅकेटची व्याप्ती आणखी मोठी असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, तपास निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे.

 

एसआयटीने सखोल तपासादरम्यान मिळालेल्या सबळ व कायदेशीर पुराव्यांच्या आधारे २६ जून रोजी डॉ. सुमंत तुकाराम शितोळे (वय ३८, व्यवसाय – डॉक्टर, मंगलमूर्ती हॉस्पिटल, पारगाव, ता. दौंड) आणि बापूराव पंढरीनाथ जांबले (वय ५७, रा. वासुंदे, ता. दौंड) यांना अटक केली. शनिवारी (२७ जून) त्यांना दौंड येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, पुढील तपासासाठी न्यायालयाने १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

 

तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, मुख्य आरोपी अण्णासाहेब आप्पा गिरी याच्याकडून बेकायदेशीर गर्भलिंग निदान झालेल्या गरोदर महिलांना डॉ. शितोळे यांच्या पारगाव येथील मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये आणले जात होते. तेथे संबंधित महिलांचे बेकायदेशीर गर्भपात करण्यात येत असल्याचे तपासातून निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

 

दुसरा आरोपी बापूराव जांबले हा या रॅकेटमध्ये एजंट म्हणून सक्रियपणे काम करत होता. बेकायदेशीर गर्भपातासाठी आवश्यक असलेली प्रतिबंधित औषधे आणि इंजेक्शने मुख्य आरोपींपर्यंत पोहोचविण्याचे काम तो करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. ही औषधे गायकवाड हॉस्पिटलमार्फत पुरवली जात असल्याची माहितीही तपासातून समोर आली आहे.

 

या संपूर्ण प्रकरणाचा तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तथा मुख्य तपासी अधिकारी संतोष तासगावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. तपासाच्या गोपनीयतेच्या कारणास्तव इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.

 

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मायने तसेच दौंड विभागाचे पोलीस उपअधीक्षक बापूसाहेब दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

 

स्त्री-भ्रूणहत्या आणि गर्भलिंग निदान हा समाजासाठी अत्यंत गंभीर व घातक गुन्हा असून, या रॅकेटमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या डॉक्टर, एजंट, मध्यस्थ अथवा इतर कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. वैद्यकीय व्यवसायाचा गैरवापर करून अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

 

या प्रकरणात आणखी काही आरोपींची नावे पुढे येण्याची शक्यता असून, एसआयटीकडून विविध ठिकाणी तपास आणि चौकशी सुरू असल्याने येत्या काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *