शिरूर बाजार समिती रणधुमाळीला सुरुवात; महायुतीची ताकद मैदानात, राजकीय घडामोडींवर जिल्ह्याचे लक्ष

अल्लाउद्दीन अलवी  प्रतिनिधी

ता. २७

पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित ठरत असलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक 2026–2031 च्या प्रचाराचा शुभारंभ घोडनदी येथील रामलिंग मंदिर परिसरात उत्साहात करण्यात आला. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून निवडणूक प्रचाराला अधिकृत सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आमदार दिलीपरावजी वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, शिरूर-हवेलीचे आमदार माऊली आबा कटके, माजी आमदार पोपटराव गावडे, भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर पाटील, शिरूर तालुका अध्यक्ष रवी बापू काळे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे, पुणे जिल्हा परिषद बांधकाम माजी सभापती मंगलदास आप्पा बांदल, माजी सभापती प्रकाश पवार, माजी सभापती शशिकांत दसगुडे, शिरूर तालुका प्रभारी अध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे, शिरूर-आंबेगाव विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष मानसिंग भैया पांचुदकर, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू ढमढेरे, शिवसेना तालुकाध्यक्ष माऊली काळे, शिरूर तालुका भाजप अध्यक्ष सुधीर भाऊ ढमढेरे तसेच शिरूर-आंबेगाव तालुकाध्यक्ष संयोगिता पलांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, निवडणुकीपूर्वी उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भेटी घेत जनसंपर्क वाढवला असून प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील राजकीय समीकरणांकडेही सर्वांचे लक्ष लागले असून दिग्गज नेते अशोक बापू पवार यांच्या भूमिकेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. आगामी काळात कोणती राजकीय जुळवाजुळव घडते आणि मतदारराजा कोणाच्या बाजूने कौल देतो, याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्त्वपूर्ण मानली जात असून प्रचाराच्या प्रारंभाने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *