सासवड पोलिसांची मोठी कारवाई : २१ लाख ७० हजार ९६० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी – शाम जगताप

सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर मोठी कारवाई करत तब्बल रुपये २१ लाख ७० हजार ९६० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर साठा आणि विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

दि. २५ जून २०२६ रोजी दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी सासवड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. मौजे बोपगाव, ता. पुरंदर, जि. पुणे येथील कानिफनाथ गडाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका गोडाऊनमध्ये महाराष्ट्र शासनाने अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा ठेवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली.

माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून गोडाऊनची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला.

कारवाईदरम्यान सिग्नेचर फिनेस्ट पान मसाला, ॲक्शन-६ कंपनीचा सुगंधी तंबाखू, आर.के. कंपनीचा सम्राट पान मसाला तसेच एसटी-१ सुगंधी तंबाखू असा विविध प्रकारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या सर्व साहित्याची एकूण किंमत रु. २१,७०,९६० इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोलीस शिपाई प्रणय राजेंद्र मखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिराज शेख (रा. शितल पेट्रोल पंपाशेजारी, कोंढवा खुर्द, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील लागू कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ व नियमन २०११ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील करत आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल (पुणे ग्रामीण), अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार (बारामती) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर (भोर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संतोष घोळवे यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोउनि अर्चना पाटील, पोलीस हवालदार विशाल जाधव, अभिजीत कांबळे, पोलीस शिपाई प्रणय मखरे, सचिन किवळे, अक्षय चिले आणि महिला पोलीस शिपाई पल्लवी काळे यांनी सहभाग घेतला.

या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटखा व तंबाखू विक्रीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *