शिरूर, प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील सरदवाडी परिसरात सोमवारी (दि. १ जून) सायंकाळी भररस्त्यात झालेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. राजस्थान ढाब्यासमोर दोन गटांमध्ये झालेल्या हल्ल्यात रेकॉर्डवरील आरोपी विशाल काळे याचा मृत्यू झाला असून केदार झाडगे हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित सनी यादव व त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ५ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान उमेश अनिल जगदाळे (वय २६), केदार झाडगे आणि विशाल काळे हे तिघेजण त्यांच्या टोयोटा टायझर (MH 12 XQ 5104) या कारमधून न्हावरा बाजूकडून शिरूरकडे येत होते. सरदवाडी येथील राजस्थान ढाब्यासमोर पोहोचताच न्हावरा फाटा बाजूकडून आलेल्या किया सोनेट (MH 14 LA 1128) या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली.
धडक दिल्यानंतर सोनेट कारमधून चार ते पाच अज्ञात व्यक्ती खाली उतरल्या आणि त्यांनी टोयोटा टायझरच्या पुढील काचेवर सलग चार राऊंड गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे टोयोटा कारमधील तिघेही जीव वाचवण्यासाठी वाहनातून उतरून पळू लागले.
दरम्यान, त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनीही हल्ल्यात सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. यामध्ये रेकॉर्डवरील आरोपी सनी यादव आणि त्याच्या साथीदारांनी तिघांवर गोळीबार केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. गोळीबारानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
घटनास्थळी विशाल काळे हा मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या चेहऱ्यावर आणि तोंडाच्या भागावर मोठी दुखापत दिसून आली असून दगडाने हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृतदेहाजवळ दोन रिकामे काडतुसे तसेच चार ते पाच मोठे दगड आढळून आले आहेत.
या घटनेत केदार झाडगे हा जखमी झाला असून त्याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उमेश जगदाळे हा घटनेनंतर घटनास्थळावरून निघून गेला होता. मात्र नंतर तो शिरूर पोलीस ठाण्यात हजर झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून पुरावे संकलित करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळावरील काडतुसे, रक्ताचे नमुने तसेच अन्य पुरावे जप्त करून तपास सुरू करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर ५ ते ६ जण होते. ते एका किया सोनेट कार आणि एका दुचाकीवरून आले होते. हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. संशयित सनी यादव आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या विविध पथकांना रवाना करण्यात आले आहे.
विशाल काळे आणि संशयित सनी यादव हे दोघेही पोलिसांच्या नोंदीवरील आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमागील नेमके कारण, जुने वाद किंवा गुन्हेगारी वैमनस्य याबाबत पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.
या धाडसी गोळीबारामुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस लवकरच आरोपींना अटक करून या प्रकरणाचा उलगडा करतील, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.




