कुत्र्याच्या त्रासावरून वाद चिघळला; दोरगेवाडीत महिलेला ढकलून पतीवर प्राणघातक हल्ला

 

 

प्रतिनिधी – विकास साळुंके 

दौंड (पुणे) : यवत परिसरातील दोरगेवाडी येथे कुत्र्यामुळे झालेल्या किरकोळ वादाचे गंभीर रूपांतर होत थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. या घटनेत एका शेतकऱ्यावर चाकूने वार करण्यात आले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. माधुरी विजय दिवेकर यांच्या शेतातील फुलझाडांचे नुकसान आरोपींच्या कुत्र्याने केल्याने त्यांनी संबंधितांना कुत्र्यावर नियंत्रण ठेवण्याबाबत सांगितले. याच कारणावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींनी दिवेकर दाम्पत्याला बोलावून घेत वाद घालत शिवीगाळ केली आणि मारहाण केली.
या वेळी फिर्यादी या वादात मध्यस्थी करण्यासाठी पुढे गेल्या असता त्यांना ढकलण्यात आले. दरम्यान, आरोपींपैकी एकाने अचानक खिशातून लोखंडी चाकू काढत “आज तुला संपवतो” अशी धमकी देत विजय दिवेकर यांच्यावर पोट व पाठीवर सपासप वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. घटनेनंतर यवत पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *