दौंडमध्ये टेम्पोतून जर्सी गाईंची अमानुष वाहतूक; चार जणांवर गुन्हा, जनावरे गोशाळेत पाठवली
दौंड : प्रतिनिधी- विकास साळुंके
दौंड शहरातील शिवाजी चौक परिसरात जर्सी गाईंची अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी चार जणांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना २७ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळवाडी येथील रुद्राक्ष विनोद लवटे हे शिक्षण घेत असताना गोरक्षक म्हणूनही कार्य करतात. २७ मार्च रोजी रात्री त्यांना त्यांच्या मित्र सुरेश पालवे यांचा फोन आला. यवत येथून एक आयशर टेम्पोमध्ये जर्सी गाई भरून दौंड मार्गे राशीनकडे नेण्यात येत असल्याची माहिती त्यांना मिळाली.
त्यानंतर रुद्राक्ष लवटे यांनी संकेत दळवी, प्रतीक पाचपुते व अहीरेश्वर जगताप या मित्रांना संपर्क साधून सर्वजण दौंड शहरातील शिवाजी चौक परिसरात थांबले. काही वेळातच संबंधित टेम्पो तेथे आल्यावर त्यांनी वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये नऊ जर्सी गाई दाटीवाटीने भरून ठेवलेल्या आढळून आल्या.
या जनावरांसाठी चारा, पाणी किंवा औषधोपचाराची कोणतीही व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले. चौकशी केली असता वाहनचालकाने आपले नाव शाहरुख नूर शेख (रा. स्वारगेट, पुणे) असे सांगितले. त्याच्यासोबत रेहान मेहबूब शेख, प्रतीक बाळासाहेब नागटिळक (रा. यवत) व मंगेश बाळासाहेब सोनवणे (रा. चापड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हे असल्याचे समोर आले.
टेम्पोमध्ये सुमारे १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या नऊ जर्सी गाई दाटीवाटीने भरून वाहतूक केली जात असल्याचे आढळले. संबंधित टेम्पोची किंमत सुमारे ४ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांनी जनावरे ताब्यात घेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून पुढील काळजीसाठी गोशाळेत पाठविण्याची व्यवस्था केली आहे. या घटनेचा पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.




