दौंडमध्ये खळबळ; ७० वर्षीय महिलेच्या खूनाचा १२ तासांत तपास पूर्ण, दोघे अटकेत

दौंडमध्ये ७० वर्षीय महिलेच्या खूनप्रकरणी १२ तासांत दोघे अटक; पोलिसांच्या तपासाला मोठे यश

प्रतिनिधी – विकास साळुंके 

दौंड : दौंड पोलिसांनी ७० वर्षीय महिलेच्या खूनप्रकरणाचा वेगाने तपास करत अवघ्या १२ तासांत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे दौंड पोलिस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी समोर आली आहे.

 

दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आर.बी. १ नगरमोरी परिसरात बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१५ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. सुमन किसन शिंदे (वय ७०) या महिलेचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन शिंदे या घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर त्या गंभीर अवस्थेत आढळून आल्या. प्राथमिक तपासात धारदार हत्याराने गळ्याजवळ वार करून त्यांचा खून करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शिर वेगळ्या ठिकाणी नेऊन टाकल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

या घटनेप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दौंड पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. विविध दिशांनी तपास करत पोलिसांनी संशयितांचा माग काढला.

 

तपासादरम्यान विक्की ऊर्फ विक्रम धनराज अत्रट आणि प्रसाद बाबूलाल चव्हाण या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्यानंतर दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

 

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार दौंड पोलिस ठाणे व तपास पथकाने केलेल्या जलद आणि समन्वयपूर्ण तपासामुळे गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.

 

दरम्यान, या खूनप्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलिसांकडून सुरू असून, खुनामागील नेमके कारण, घटनेतील इतर बाबी तसेच या प्रकरणाशी संबंधित आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे.

 

आरजे न्यूज २७ मराठीसाठी

विकास साळुंके

दौंड तालुका प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *