दौंडमधील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई; धोकादायक इसमाची नागपूर कारागृहात रवानगी

दौंड (प्रतिनिधी) : विकास साळुंके

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सराईत व धोकादायक गुन्हेगारांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत दौंड शहरातील एका सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व इतर विघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत (एमपीडीए) कठोर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित आरोपीस अटक करून मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे स्थानबद्ध करण्यात आले असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्ह्यातील मागील काही वर्षांतील गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व जामिनावर मुक्त झाल्यानंतर पुन्हा गुन्हेगारीकडे वळलेल्या सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. त्यानुसार दरोडा, जबरी चोरी, खंडणी, महिलांवरील अत्याचार, अल्पवयीन मुलींवरील गुन्हे, खुनाचा प्रयत्न, शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील रितेश भिमराव गायकवाड (वय २७, रा. भीमनगर, दौंड) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, महिलांवर व अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न, जबर मारहाण, दरोडा, धमकावणे व इतर गंभीर स्वरूपाचे एकूण सात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीच्या सातत्यपूर्ण गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आले.

दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी आरोपीविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठांकडे सादर केला होता. त्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी प्रस्तावाची छाननी करून पुढील कार्यवाहीसाठी तो जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांच्याकडे पाठविला.

प्रस्तावाचा सर्वंकष आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचे लक्षात घेऊन त्याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश जारी केला.

आदेशानंतर दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने आरोपीचा शोध घेऊन २ ऑगस्ट २०२६ रोजी त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीची मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे रवानगी करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दरडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व दौंड पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

पुणे ग्रामीण पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधातील मोहीम पुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असून, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा कठोर प्रतिबंधात्मक कारवाया सातत्याने करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *