प्रतिनिधी : योगेश राऊत
पाटस, ता. दौंड : पडवी (माळवाडी) येथील श्री दत्त औदुंबर सेवा संस्था व श्री दत्त सेवेकरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच श्री आण्णा महाराज रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त मंदिर, रंधवे वस्ती येथे गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन, हरिकीर्तन, महाप्रसाद तसेच मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू निदान आणि रक्तदान शिबिर अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने उत्सवाला धार्मिकतेबरोबरच सामाजिक सेवेचीही जोड लाभली.
उत्सवाची सुरुवात सकाळी सात वाजता श्री दत्त महाराजांच्या आरतीने झाली. त्यानंतर गुरुचरित्र पारायणाची सांगता व श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. सकाळी आठ ते नऊ या वेळेत श्री दत्त महाराजांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी नऊ ते अकरा या वेळेत वैदिक मंत्रोच्चारात होमहवन विधी पार पडला. सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत विविध भजनी मंडळांनी सादर केलेल्या सुमधुर भजनांनी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
दुपारी एक ते तीन या वेळेत ह.भ.प. तुषार महाराज दूरगुडे (वरवंड) यांचे हरिकीर्तन झाले. आपल्या प्रभावी कीर्तनातून त्यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, अध्यात्माची शिकवण आणि समाजहिताचा संदेश उपस्थित भाविकांपर्यंत पोहोचविला. कीर्तनानंतर दुपारी तीन वाजता श्री आण्णा महाराज रंधवे यांचे पाद्यपूजन करण्यात आले. त्यानंतर साडेतीन वाजता हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
उत्सवात परिसरातील अनेक भजनी मंडळांनी सहभाग नोंदवत भक्तिमय वातावरण अधिकच भारावून टाकले. श्री विठ्ठल भजनी मंडळ (माळवाडी), श्री संत सावतामाळी भजनी मंडळ (गिरीम), श्री पडवी भजनी मंडळ, श्री वरवंड भजनी मंडळ, श्री भानोबा भजनी मंडळ (कुसेगाव), श्री भानोबा भजनी मंडळ (तामखडा), श्री नागेश्वर भजनी मंडळ (पाटस) तसेच भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळ (गिरीम) यांनी उत्कृष्ट भजन सेवा सादर करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
गुरुपौर्णिमा उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक कार्यक्रमांसोबत समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन. बुधराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर आयोजित करण्यात आले. ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिर घेण्यात आले, तर बालाजी ब्लड सेंटर, लोणंद यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आरोग्य तपासणी करून घेतली आणि रक्तदान करून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपली.
धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी सेवा उपक्रम राबविल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी श्री दत्त औदुंबर सेवा संस्था, श्री दत्त सेवेकरी मंडळ तसेच श्री आण्णा महाराज रंधवे यांचे विशेष कौतुक केले. या उत्सवासाठी परिसरातील विविध गावांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. श्री दत्त महाराजांचे दर्शन, पूजा-अर्चा, भजन-कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घेत भक्तांनी गुरुपौर्णिमा उत्सवाचा आनंद लुटला.
धार्मिक परंपरा, अध्यात्म, सामाजिक सेवा आणि आरोग्य जनजागृती यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा गुरुपौर्णिमा उत्सव पडवी-माळवाडी परिसरातील भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.




