शिरूर, प्रतिनिधी :विजय कांबळे
शिरूर तालुक्यातील शिंदोडी गावातील एका शेतकऱ्याच्या डाळिंब बागेतून तब्बल ८० हजार रुपये किमतीची सुपर भगवा जातीची डाळिंबे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजाराम भानुदास ओव्हाळ (वय ४२, व्यवसाय – शेती, रा. शिंदोडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या मालकीच्या मौजे शिंदोडी येथील गट क्रमांक १०६/२ मधील डाळिंब बागेत ही घटना घडली. दिनांक १३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ८.३० वाजल्यापासून १४ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने बागेतील सुपर भगवा जातीची सुमारे ८०० किलो डाळिंबे, प्रत्येकी १०० रुपये प्रति किलो दराने, एकूण ८० हजार रुपयांचा माल चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
शेतकऱ्याच्या संमतीशिवाय आर्थिक फायद्याच्या उद्देशाने ही चोरी करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला असून, त्यानुसार शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६५३/२०२६ नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाची नोंद सहाय्यक फौजदार चव्हाण यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार मोरे (बकल क्रमांक १५७२) करीत आहेत. दरम्यान, परिसरातील शेतमाल चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवून आरोपींचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.




