दौंडमधील आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फरार आरोपीला येरवड्यातून अटक

दौंडमधील आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फरार आरोपीला येरवड्यातून अटक

 

गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दौंड पोलिसांची कारवाई; न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली

 

प्रतिनिधी – योगेश राऊत | 

 

दौंड शहरातील महादेव गल्ली परिसरात घडलेल्या आत्महत्येप्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीला दौंड पोलिसांनी तब्बल दोन महिन्यांनंतर येरवडा (पुणे) येथून अटक केली आहे. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजण्यापूर्वी विवेक शंकर गटणे (रा. महादेव गल्ली, दौंड) यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर त्यांचा मुलगा अद्वैत विवेक गटणे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दौंड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक २९८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये दि. १२ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू होता. त्यामध्ये आरिफ शमशुद्दीन शेख (वय ५२, रा. कुंभार गल्ली, दौंड) याचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, पोलीस हेड कॉन्स्टेबल बोराडे आणि पोलीस कॉन्स्टेबल माने यांनी गोपनीय माहिती संकलित करून तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा ठावठिकाणा निश्चित केला.

 

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने पुण्यातील येरवडा येथे सापळा रचून दि. १४ जुलै २०२६ रोजी आरोपीला ताब्यात घेत अटक केली. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. १७ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

या प्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलीस करीत असून, गुन्ह्याशी संबंधित इतर बाबींचाही सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *