*महाबळेश्वरला पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाची जमावाकडून हत्या; चौघे पोलिसांच्या ताब्यात…..*
मृत तरुण इंदापूर तालुक्यातील भिगवन येथील रहिवाशी..
*प्रतिनिधि: राजेंद्र शिंदे*
महाबळेश्वर परिसरामध्ये पर्यटनासाठी आलेल्या भिगवण येथील एका २५ वर्षीय युवकाची दारूच्या नशेत घरात डोकावल्याच्या कारणावरून लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना पाचगणीजवळ भोस (ता. महाबळेश्वर) येथे घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेमुळे महाबळेश्वर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून, पाचगणी पोलिसांनी याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
*मृताचे नाव व आरोपींची माहिती*
*मृत तरुण:* अक्षय रमेश जाधव (वय २५, रा. भिगवण, ता.इंदापूर,जि. पुणे).
*ताब्यात घेतलेले संशयित:*
१. सूर्यकांत चंद्रकांत गोले (रा. भोस, ता. महाबळेश्वर)
२. अविनाश सतीश भोसले (रा. बावधन, ता. वाई)
३. राहुल जनार्दन राजपुरे (रा. कनूर, ता. वाई)
४. अमोल गणेदेव वाडकर (रा. चिखली, ता. वाई)
*नेमकी घटना काय घडली?*
अक्षय जाधव हा आपल्या मित्रांसह महाबळेश्वर परिसरात पर्यटनासाठी आला होता. त्यांनी भोस येथील ‘अतिथी व्हिला हॉटेल’ येथे मुक्काम केला होता. बुधवारी रात्री अक्षयने मद्यप्राशन केले होते. त्याचे अधिक मद्यप्राशन झाल्याने मित्रांनी त्याला खोलीत ठेवून बाहेरून कडी लावली होती.
काही वेळाने मित्र खोलीवर परत आले असता अक्षय खोलीत दिसून आला नाही. त्यामुळे मित्रांनी त्याचा शोध सुरू केला. शोध घेत असताना हॉटेलच्या खालील बाजूस काही अंतरावर गर्दी आणि बॅटरीचा प्रकाश दिसून आला. मित्रांनी तिथे धाव घेतली असता, सूर्यकांत गोले याच्या घरात डोकावल्याच्या कारणावरून अक्षयला सूर्यकांत गोले याच्यासह इतर संशयित लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी चिखलात तुडवून बेदम मारहाण करत असल्याचे दिसून आले.
*मित्रांचा वाचवण्याचा प्रयत्न अपयशी*
घरात एका मुलीने फोन केल्यानंतर तिचे वडील व त्यांच्या साथीदारांनी दारूच्या नशेतच अक्षयला गाठले होते. अक्षयचे मित्र आणि स्थानिक नागरिकांनी संशयितांना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र मद्यपान केलेल्या संशयितांनी कोणाचेही न ऐकता अक्षयला जबर मारहाण सुरूच ठेवली.
*उपचारापूर्वीच मृत्यू आणि पोलीस कारवाई*
या जीवघेण्या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी प्रथम पाचगणी व नंतर वाई येथे हलवण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला पुढील उपचारासाठी अन्यत्र नेण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांच्या सूचनेनुसार त्याला बारामती येथील डॉ. बोके रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच अक्षयचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर विशाल अजित जाधव यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, जो नंतर पाचगणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. स.पो.नि. दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पाचगणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत चारही संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मृत अक्षय जाधव यांच्यावर इंदापूर तालुक्यातील भिगवण स्मशामभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.




