दौंड | प्रतिनिधी- विकास साळुंके
दौंड शहरातील शालीमार चौक परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका जुगारावर दौंड पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १८ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास दौंड येथील कोहीनूर अपार्टमेंटच्या मागील बाजूस, भावना हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही व्यक्ती बेकायदेशीररित्या मटका जुगार चालवत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून छापा टाकला.
छाप्यात चंदू राम नगरकर हा व्यक्ती ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार चालवत असल्याचे आढळून आले. तसेच या जुगारातून जमा होणारी रक्कम विल्यम अटोनी आरीकम (वय ६५, रा. दत्तमंदिर, दौंड) याच्याकडे दिली जात असल्याची माहितीही उघड झाली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे १,२०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित दोन्ही आरोपींविरुद्ध सरकारतर्फे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार निकम हे करत आहेत.
दरम्यान, दौंड पोलिसांनी शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर कारवाईचा धडाका कायम ठेवण्याचा इशारा दिला असून अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार असल्याचे सांगितले आहे.




