वीर बाजी पासलकर विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत  

वीर बाजी पासलकर विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत  

प्रतिनिधी शाम जगताप

 वीर बाजी पासलकर विद्यालय सासवड, शाळा क्रमांक एक येथे शैक्षणिक वर्ष 2026 – 27 च्या प्रारंभी शाळा प्रवेश व नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी सासवड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच मुलांचे स्वागत करताना शाळेत होणाऱ्या सर्व कार्यक्रमात मुलांनी आनंदाने सहभागी व्हावे, शिक्षक जे परिश्रम घेतात त्याला विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे असे नगरसेविका स्मिता जगताप यांनी मनोगतातून व्यक्त केले व सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट पुड्यांचा खाऊ दिला. त्याबरोबरच विद्यार्थ्यांचे यश हे शाळा,शिक्षक आणि पालकांच्या संयुक्त प्रयत्नांचे फळ असते असे नगरसेवक वैभव टकले यांनी व्यक्त करून मुलांना मोफत वह्या व दप्तरे देण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी गोविंद लाखे,पंचायत समितीच्या मूल्यवर्धन तालुका समन्वयक सुप्रिया धुमाळ, नगरसेवक सोपान रणपिसे, शितल भोंडे व भूषण मचाले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी मुळीक यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगून नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देऊन शालेय उपक्रमांची माहिती सांगितली.तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी प्रभात फेरी काढून, मुलांचे औक्षण करून मुलांचे पहिले पाऊल शाळेत उमटवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेच्या उंबरठ्यावर ज्ञानाचे स्वागत, नव्या स्वप्नांना नवी दिशा मिळावी यासाठी शाळेचा पहिला दिवस हा केवळ प्रवेशाचा नसतो, तर विद्यार्थ्यांचा स्वप्नांना पंख देणाऱ्या नव्या प्रवासाचा शुभारंभ असतो अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. तसेच शाळेत नियमितपणे विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक मूल्य आत्मसात करावीत असा मौलिक संदेश देण्यात आला. याप्रसंगी वर्षा खळदकर, संजीव कांबळे, वासंती बडधे, विजयश्री चव्हाण, मीना कांबळे, मनीषा फडतरे, संगीता हराळे व बहुसंख्य पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव कांबळे तर आभार वर्षा खळदकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *