दौंड, प्रतिनिधी – विकास साळुंके
(आर जे न्यूज 27 मराठी) : दौंड तालुक्यातील खोरवडी व आलेगाव परिसरातील विविध वाड्या-वस्त्यांवर मध्यरात्री पाच ते सात अज्ञात दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकत तब्बल ७ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० जून रोजी पहाटे १ ते ३.१० वाजण्याच्या दरम्यान खोरवडी व आळेगाव गावांच्या हद्दीतील विविध वाड्या-वस्त्यांवर दरोडेखोरांच्या टोळीने धाड टाकली. चाकू, कोयता, लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, लाकडी काठ्या आणि दगडांचा धाक दाखवत घरातील सदस्यांना मारहाण, दमदाटी व शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच मोटारसायकली असा मोठा ऐवज जबरदस्तीने घेऊन आरोपी पसार झाले.
या दरोड्यात अनेक कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून महिलांच्या अंगावरील दागिन्यांसह घरात सुरक्षित ठेवलेला सोन्याचा ऐवज आणि रोकडही चोरट्यांनी लंपास केली. काही ठिकाणी घरातील धान्याच्या पोत्यांमध्ये लपवून ठेवलेले दागिनेही आरोपींनी शोधून काढल्याने या टोळीने पूर्वनियोजन करून परिसराची रेकी केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीद्वारे आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, एका रात्रीत अनेक घरांवर झालेल्या दरोड्यामुळे खोरवडी व आळेगाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. :::




