चांडोह येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून तुफान हाणामारी; १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
लोखंडी रॉड, लाकडी दांडक्यांनी हल्ला; महिलांसह १९ जण जखमी
“जमिनीत यायचे नाही” म्हणत मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी
शिरूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल
जमिनीच्या वादातून गावात तणावाचे वातावरण; पोलीस तपास सुरू
चांडोह येथे जमिनीच्या वादातून तुफान हाणामारी; १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी : विजय कांबळे
नागरगाव – शिरूर तालुक्यातील चांडोह येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीप्रकरणी १८ जणांविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत महिलांसह १९ जण जखमी झाले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलास कोंडीभाऊ सालकर (वय ४०, रा. चांडोह, ता. शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ३० मे २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मौजे चांडोह येथील गट क्रमांक ४४/२ मधील वडिलोपार्जित जमिनीत घडली.
तक्रारीनुसार, आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना “या जमिनीत यायचे नाही” असे सांगत लोखंडी रॉड, लाकडी दांडके तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादी कैलास सालकर यांच्यासह गणेश, विलास, बाळू, शिवाजी, भगवान, पांडुरंग, नवनाथ, निलेश, योगेश सालकर तसेच कमल, सुरेखा, वेदिका, सोनाली, छाया, ऋषाली, पुष्पा, स्नेहल, शितल आणि हौसाबाई सालकर हे जखमी झाले.
याशिवाय आरोपींनी शिवीगाळ करत दमदाटी केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली असून प्रकरणाचा तपास सहायक फौजदार चव्हाण करीत आहेत.
दरम्यान, जमिनीच्या वादातून घडलेल्या या घटनेमुळे चांडोह परिसरात चर्चेला उधाण आले असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.




