३३ वर्षे ९ महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिलीप एकनाथ चव्हाण यांचा सेवानिवृती सत्कार
“ चव्हाण मामा” यांचे शाळेसाठीचे योगदान सदैव स्मरणात राहील – प्राचार्य कृष्णा जगदाळे
रयत शिक्षण संस्थेच्या पारगाव शाखेच्या प्रगतीत ग्रामस्थांचे मोठे योगदान – सयाजी आण्णा ताकवणे
शिक्षकांइतकेच शिपाई व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे; शिक्षकेत्तर भरती तातडीने सुरू करण्याची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, पारगाव येथे सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न
विजय कांबळे – प्रतिनीधी
नागरगाव – पारगाव (सालू-मालू), ता. दौंड, जि.
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, पारगाव (सालू-मालू) येथील ज्येष्ठ शिपाई मा. श्री. दिलीप एकनाथ चव्हाण (एम.कॉम.) हे तब्बल ३३ वर्षे ९ महिन्यांच्या प्रदीर्घ, निष्ठावान व उल्लेखनीय सेवेनंतर सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा भव्य सत्कार व गौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शाळेच्या प्रगतीत, स्वच्छता व्यवस्थापनात, शिस्त राखण्यात, विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनात तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांशी स्नेहपूर्ण संबंध जपण्यात त्यांनी बजावलेली भूमिका उपस्थितांनी कृतज्ञतापूर्वक स्मरण केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सयाजी आण्णा ताकवणे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती दिलीप चव्हाण यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संभाजी ताकवणे (माजी उपसरपंच व संचालक, पारगाव विकास सोसायटी) व संजय नाना ताकवणे यांच्या हस्ते विजय दर्डा लिखित “न संपणारे शब्द” हे पुस्तक भेट देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
मनोगत व्यक्त करताना संभाजी ताकवणे यांनी सांगितले की, चव्हाण मामा यांनी शाळेतील स्वच्छता, विविध कार्यक्रमांचे नियोजन, टेबल-खुर्च्यांची व्यवस्था तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य अत्यंत प्रामाणिकपणे केले. त्यांच्या सेवेमुळे शाळेतील अनेक उपक्रम यशस्वी झाले असून हा सत्कार त्यांच्या कर्तव्यनिष्ठ कार्याचा योग्य गौरव आहे.
ह.भ.प. अंबादास नेटके महाराज यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ज्ञानमंदिराची उभारणी केवळ शिक्षकांच्या बळावर होत नाही, तर शिपाई, लिपिक, मुख्याध्यापक, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून शाळेची प्रगती घडते. दिलीप चव्हाण यांनी आपल्या सेवेतून हीच मूल्ये जपली असून त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
सयाजी आण्णा ताकवणे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा उल्लेख करत सांगितले की, रयत शिक्षण संस्था महाराष्ट्रभर विस्तारलेली असली तरी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, पारगाव ही संस्थेची एक महत्त्वपूर्ण शाखा आहे. या शाखेच्या विकासात पारगाव परिसरातील ग्रामस्थ, पालक, शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिकांचे मोठे योगदान आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे ही शाखा उभी राहिली आणि आज हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षण घडविणारे सक्षम ज्ञानमंदिर बनली आहे. या वाटचालीत दिलीप चव्हाण यांसारख्या कर्मचाऱ्यांचे योगदानही अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. तसेच शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी शासनाने भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
शिवाजी भाडळे यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी समाज, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांनी एकजुटीने कार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कोणतेही काम लहान अथवा मोठे नसते; प्रत्येक कार्य मौल्यवान असते. सध्या अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून शासनाने ही पदे तातडीने भरावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात प्राचार्य कृष्णा जगदाळे यांनी दिलीप चव्हाण यांच्या सेवाकाळाचा सविस्तर आढावा घेतला. शाळेच्या विकासात, स्वच्छता व्यवस्थापनात आणि संस्थेच्या विविध उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीत त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सरपंच सुभाष तात्या बोत्रे, तंटामुक्ती अध्यक्ष शामराव ताकवणे, माजी उपसरपंच सोमनाथ ताकवणे, कुस्तीगीर अध्यक्ष रवींद्र बोत्रे, ह.भ.प. विकास ताकवणे, प्रगतशील शेतकरी रामदास ताकवणे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संजय नाना ताकवणे , मधूकर ताकवणे , अशोक बोत्रे यांच्यासह ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित शिक्षकांमध्ये मुराद तांबोळी सर, ज्ञानेश्वर झगडे सर, सुनील शिंदे सर, प्रतिभा कुंभार मॅडम यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख जाधव सर व मंजुश्री देशमुख मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन पुष्पा देशमुख मॅडम यांनी मानले.
भावनिक वातावरणात पार पडलेल्या या गौरव सोहळ्यात उपस्थितांनी दिलीप एकनाथ चव्हाण यांना निरोगी, आनंदी, सुखसमृद्ध व दीर्घायुषी सेवानिवृत्त जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रदीर्घ व समर्पित सेवेला उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली.




