स्वलिखित काव्यसंग्रहाची वाचनालयास साहित्यभेट; शिक्रापूरमध्ये साहित्यसेवेचा आदर्श

शिक्रापूर : प्रतिनिधी- विवेकानंद फंड 
शिक्रापूर येथील शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालय, ग्रामपंचायत शिक्रापूर येथे साहित्यप्रेम आणि वाचनसंस्कृती जपणारा प्रेरणादायी उपक्रम पार पडला. वाजेवाडी येथील साहित्यिक तथा कवी जयसिंग प्रभाकर तिखे यांनी आपल्या स्वलिखित काव्यसंग्रहाचा संच वाचनालयास सप्रेम भेट देत साहित्यसेवेचा आदर्श घालून दिला.
या प्रसंगी वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी तिखे यांचे मनःपूर्वक आभार मानत पुस्तक संच स्वीकारला. तिखे यांनी भेट दिलेल्या काव्यसंग्रहामध्ये समाजप्रबोधन, संस्कृती, निसर्गप्रेम तसेच मानवी भावभावनांचे प्रभावी चित्रण करण्यात आले असून वाचकांना वैचारिक आणि साहित्यिक मेजवानी मिळणार आहे.
वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात प्राप्त झालेली ही साहित्यभेट वाचनप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणार असून नवोदित कवी आणि लेखकांनाही लेखनासाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास सरपंच रमेशराव गडदे यांनी व्यक्त केला.
यावेळी ग्रामपंचायत शिक्रापूर वाचनालयाचे व्यवस्थापक तथा आदर्श ग्रंथपाल संतोष दशरथ काळे पाटील, कर्तव्य फाउंडेशन शिक्रापूरच्या अध्यक्षा मनीषा गडदे, वाचनालय सभासद बबनराव मांढरे तसेच तिखे परिवार उपस्थित होता.
कार्यक्रमात बोलताना जयसिंग तिखे यांनी पुढील काळातही वाचनालयाच्या विविध साहित्यिक व सामाजिक उपक्रमांना सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रंथपाल संतोष काळे पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *