“दहा किलोमीटरचा प्रवास अन् यशाची शिखरे; नागरगावच्या समृद्धी शिंदेची दहावीत ९४.४० टक्क्यांसह विद्यालयात प्रथम”

विजय कांबळे – प्रतिनिधी
नागरगाव :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करण्याची ताकद किती मोठी असते, याचे प्रेरणादायी उदाहरण नागरगाव येथील कु. समृद्धी हनुमंत शिंदे हिने दाखवून दिले आहे. श्री मल्लिकार्जुन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २०२६ च्या निकालात समृद्धी हिने तब्बल ९४.४० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
विद्यालयाचा निकाल यंदा शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे समृद्धी ही नागरगाव येथून दररोज सुमारे दहा किलोमीटर अंतर पार करून न्हावरा येथे शिक्षणासाठी जात होती. ग्रामीण भागातील मर्यादित सुविधा, प्रवासाचा ताण आणि अभ्यासाचे आव्हान असूनही तिने शिक्षणावरील निष्ठा कायम ठेवत सातत्यपूर्ण अभ्यास केला.
समृद्धीच्या यशामागे तिची मेहनत, नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला. तसेच श्री मल्लिकार्जुन क्लासेस यांचेही तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे नागरगाव गावाचे नाव तालुक्यात उज्ज्वल झाले असून पंचक्रोशीतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समृद्धीचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी समृद्धीचे यश प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *