फलटण प्रतिनिधी : वैष्णव ढमाळ
जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी संचलित हिंगणगाव माध्यमिक विद्यालय, हिंगणगाव (ता. फलटण, जि. सातारा) या विद्यालयाने एसएससी बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये उज्ज्वल यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९५.६५ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
यंदाच्या परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण २३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २२ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे सेमी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला असून मराठी माध्यमाचा निकाल ९३.३३ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीसह शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाल्याची भावना पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. यामध्ये अक्षदा शिंदे व सृष्टी पिंगळे यांनी प्रत्येकी ८५.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अनुष्का जाधव हिने ८५.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला तर प्रतीक्षा बोबडे हिने ८४ टक्के गुण मिळवत विशेष यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. सह्याद्री चिमणराव कदम (भैय्यासाहेब) यांनी अभिनंदन करत विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची ही परंपरा कायम ठेवावी, असे आवाहन केले. तसेच सोसायटीच्या सचिव मा. श्रीमती शारदादेवी चिमणराव कदम (काकी) यांनीही विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना हे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. हिंगणगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यालयाच्या उज्ज्वल यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.




