ओंकार शुगरकडून ऊसबिलांचे वितरण; शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा, बाबुराव बोत्रे पाटील यांचा विश्वासाचा शब्द”

ओंकार शुगरकडून ऊसबिलांचे वितरण; शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा, बाबुराव बोत्रे पाटील यांचा विश्वासाचा शब्द
अल्लाउद्दीन अलवी  प्रतिनिधी | ता. ८
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, ओंकार शुगर ग्रुपकडून गळीत हंगाम २०२५-२०२६ मधील ऊसबिलांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत ओंकार शुगर व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत.
ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुरावजी बोत्रे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, १५ जानेवारी २०२६ पर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन ३५५० रुपये तर १६ जानेवारीनंतर ऊस दिलेल्या सर्व उत्पादकांना प्रतिटन ३६०० रुपये बाजारभावानुसार देयके अदा करण्यात आली आहेत. आजअखेरची सर्व थकबाकी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात अनेक ठिकाणी बंद पडलेल्या साखर कारखान्यांना पुन्हा उभारी देण्याचे काम ओंकार शुगर ग्रुपने केले असल्याचा उल्लेख करत बाबुराव बोत्रे पाटील म्हणाले की, “ज्या भागात कारखाने बंद पडले होते, त्या भागातील आर्थिक चक्र थांबले होते. बाजारपेठेतील व्यवहार मंदावले होते. अशा परिस्थितीत ओंकार शुगरने पुढाकार घेत कारखानदारी पुन्हा सुरू करून त्या भागाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.”
तसेच कारखाना कामगार, ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार यांची देणी वेळोवेळी दिली जात असून, वाढीव पगारवाढीमुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचेही त्यांनी सांगितले. काही तांत्रिक अडचणींमुळे देयक वितरणास थोडा विलंब झाला होता, मात्र सर्व थकबाकी अदा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही समाजकंटकांकडून स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी ओंकार शुगर ग्रुपची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “अफवा आणि चुकीच्या माहितीवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. ओंकार शुगर नेहमीच शेतकरी, कामगार आणि संबंधित घटकांच्या हितासाठी कार्यरत राहील,” असे आवाहन बाबुराव बोत्रे पाटील यांनी केले.
ऊसबिलांची रक्कम थेट खात्यात जमा झाल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी गळीत हंगामाबाबतही सकारात्मक अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *