भीमा पाटस कारखान्यात मोठा निर्णय; आमदार राहुल कुल यांचे संचालक मंडळ बरखास्त

दौंड (प्रतिनिधी – विकास साळुंके):
दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना, पाटस येथे मोठा प्रशासकीय निर्णय घेत आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
या आदेशानुसार कारखान्याच्या कारभारासाठी प्रशासकीय यंत्रणा नियुक्त करण्यात आली असून, प्रशासकीय अध्यक्षपदी वसंत साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रशासकीय संचालक म्हणून तुषार दत्तात्रय शितोळे आणि संभाजी दत्तात्रय ताकवणे यांची निवड करण्यात आली आहे. या नव्या नियुक्तींमुळे कारखान्याच्या प्रशासनात बदलाची नवी दिशा मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, नव्याने नियुक्त प्रशासकीय मंडळाने आज दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी कारखाना परिसरात पदभार स्वीकारला. यावेळी संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मधुकर काका शितोळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्याची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी सभासदांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.
संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर कारखान्याच्या सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत असून, नवीन प्रशासनाकडून कारखान्याचा कारभार अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुढील काळात या निर्णयाचे राजकीय आणि सहकारी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *