अल्लाउद्दीन अलवी | पुणे जिल्हा प्रतिनिधी | ता. २३
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात आज विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान शांततेत व उत्साहात पार पडत असून मतदारांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काटेवाडी येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्राताई पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला.
माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून, सुरुवातीला तब्बल ५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. काही उमेदवारांनी माघार न घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता फोल ठरली. महायुतीकडून सुनेत्राताई पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्षासह अनेक घटक पक्षांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
या निवडणुकीत राज्य व देशपातळीवरील दिग्गज नेत्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघात प्रचारयंत्रणा राबवून वातावरण ढवळून काढले होते.
दरम्यान, माळेगाव खुर्द येथे मतदान केंद्रांना भेट देत आमदार अमोल मिटकरी यांनी मतदान प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, उपाध्यक्ष बाळासाहेब अर्जुनराव नागवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
माळेगाव खुर्द येथील मतदान केंद्रांवर दुपारी दीड वाजेपर्यंत बुथ क्रमांक २१५ वर ३३० तर बुथ क्रमांक २१६ वर ४०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारच्या उन्हामुळे सुरुवातीला मतदानाचा वेग काहीसा मंदावलेला दिसला, मात्र दुपारनंतर मतदानाचा ओघ वाढेल, असा विश्वास उपाध्यक्ष बाळासाहेब नागवडे यांनी व्यक्त केला.
एकूणच बारामती पोटनिवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढताना दिसत असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे.




