घरटे वाटप उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पक्षी संवर्धनाची जाणीव; पिंपरी दुमाला शाळेत ‘जागतिक

पुणे ● विवेकानंद फंड
शिरूर तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा पिंपरी दुमाला येथे ‘जागतिक चिमणी दिन’ निमित्त राबविण्यात आलेल्या घरटे वाटप उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांप्रती संवेदनशीलता आणि पर्यावरण जपण्याची जाणीव दृढ करण्यात आली. शिरूर तालुका पर्यावरण व प्रदूषण निवारण मंडळाच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सध्या वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे पशुपक्ष्यांचे जीवन कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपक्रमशील शिक्षक प्रवीण कुमार जगताप यांनी स्वखर्चाने तालुक्यातील विविध शाळांमध्ये ‘चिमणी संवर्धनासाठी घरटे वाटप’ हा उपक्रम सुरू केला आहे. पिंपरी दुमाला शाळेच्या परिसरात नैसर्गिक वातावरण अनुकूल असल्यामुळे या ठिकाणी विशेष उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संजय देशमुख यांनी विद्यार्थ्यांना पक्षी संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात माजी सरपंच कैलास पिंगळे यांनी पक्ष्यांबाबतचे अनुभव कथन करत, गावपातळीवर संवर्धनाचे प्रयत्न वाढवण्याची गरज अधोरेखित केली. तसेच प्रगतशील बागायतदार नेहरू चिखले यांनी गावात पक्षी संवर्धनासाठी पर्यावरण मंडळाच्या सहकार्याने अधिक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.
हिरवाईने नटलेल्या शाळा परिसरात अशा प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता होती, असे मत व्यक्त करत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद दुर्गे व उपाध्यक्ष मोहिनी चिखले यांनी पर्यावरण मंडळाचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मुख्याध्यापक राहुल चातुर, तंत्रस्नेही शिक्षक कांताराम शिंदे, स्वयंसेविका शोभा डोळस आणि स्वच्छता दूत किरण चिखले यांनी केले. गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रीतम कोकणे आणि केंद्रप्रमुख विजय गोडसे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक बदल घडतो, असे मत व्यक्त केले.
एकूणच, घरटे वाटपाच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकापुरते ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचे धडे देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *