नागरगाव (प्रतिनिधी – विजय कांबळे)
पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागात कार्यरत असलेले आणि ऐतिहासिक शनिवार वाडा येथे अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा देणारे सुरक्षा रक्षक अनिल हरी बागाव यांच्या इमानदारीची दखल घेत विश्रामबाग पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान केला.
अनिल बागाव हे गेल्या अनेक वर्षांपासून शनिवार वाडा परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. शनिवार वाडा पाहण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. गर्दीच्या ठिकाणी अनेकदा पर्यटक मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप किंवा इतर मौल्यवान वस्तू विसरून जातात. अशा वेळी बागाव या वस्तू सुरक्षित ठेवून त्या संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे काम अत्यंत प्रामाणिकपणे करत आले आहेत.
अनेक वेळा हजारो रुपयांच्या किमतीच्या वस्तू त्यांच्या ताब्यात आल्या, मात्र त्यांनी त्या स्वतःकडे न ठेवता संबंधित पर्यटकांचा संपर्क क्रमांक शोधून त्यांना बोलावून वस्तू परत दिल्या. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे अनेक पर्यटकांनी त्यांचे कौतुक केले असून त्यांच्या कामाची चर्चा सर्वत्र होत आहे.
आजच्या काळात इमानदारी दुर्मिळ होत चालली असताना अनिल बागाव यांचे कार्य समाजासाठी आदर्श ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेमुळे त्यांच्यावर पारितोषिकांचा वर्षाव होत असून समाजातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील यांनीही अनिल बागाव यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अनिल बागाव यांची प्रामाणिक सेवा ही केवळ कर्तव्यपूर्ती नसून समाजात इमानदारीचा संदेश देणारी ठरत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.





