हडपसर–पाटस महामार्गावरील बसथांब्यांवर शेडचा अभाव; उन्हाच्या तडाख्यात प्रवाशांचे हाल, तातडीने सुविधा देण्याची मागणी
दौंड : प्रतिनिधी
हडपसर–केडगाव चौफुला–दौंड–पाटस या महत्त्वाच्या मार्गावर धावणाऱ्या पीएमपीएमएल बससेवेचा मोठ्या प्रमाणात नागरिक वापर करत असले तरी या मार्गावरील अनेक बसथांब्यांवर प्रवाशांसाठी शेडची कोणतीही व्यवस्था नसल्याने प्रवाशांना उन्हाच्या कडक तडाख्यात बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. परिणामी महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच रोजंदारीवर जाणाऱ्या कामगारांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
या मार्गावर प्रवासी वाहतुकीची मोठी गर्दी असते. दौंड, केडगाव चौफुला, पाटस तसेच आसपासच्या गावांमधील नागरिक शिक्षण, नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज पीएमपीएमएल बससेवेवर अवलंबून असतात. मात्र अनेक बसथांबे केवळ नाममात्र असून तेथे सावलीसाठी शेड किंवा आसनव्यवस्था नसल्याने प्रवाशांना रस्त्याच्या कडेला उन्हात उभे राहून बसची वाट पाहावी लागते.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा वाढत असल्याने प्रवाशांना उघड्यावर उभे राहणे अत्यंत कठीण ठरत आहे. विशेषतः महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. काही ठिकाणी प्रवासी झाडांच्या सावलीत किंवा दुकानदारांच्या आडोशाला थांबत असल्याचेही दिसून येते.
स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही संबंधित प्रशासनाकडे बसथांब्यांवर शेड उभारण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक प्रमुख बसथांब्यावर मजबूत शेड, आसनव्यवस्था व माहिती फलक उभारण्याची गरज असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, पीएमपीएमएल प्रशासन तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन हडपसर–पाटस मार्गावरील बसथांब्यांवर तातडीने शेड उभारावेत, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रवाशांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष न करता प्रशासनाने लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
— विकास साळुंके, दौंड तालुका प्रतिनिधी
आरजे न्यूज 27 मराठी





