डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बौद्ध समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान ‘स्वरूपानंद’वर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची आरपीआयची मागणी
प्रतिनिधी :- Rjnews27marathi
यवत (दौंड):
नाशिक येथील तथाकथित भोंदू बाबा अशोक खरात याच्या प्रकरणावरून ‘स्वरूपानंद’ नावाच्या आध्यात्मिक व्यक्तीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध (महार) समाजाबद्दल अत्यंत अवमानकारक विधान केले आहे. या विधानामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधितावर ‘सुमोटो’ दखल घेऊन अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) दौंड तालुक्याच्या वतीने यवत पोलीस स्टेशनला देण्यात आले.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील अशोक खरात हा हाय प्रोफाईल महिलांचे शोषण करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणावर भाष्य करताना स्वरूपानंद याने एका व्हिडिओमध्ये खरात हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीचा असून तो ‘क्षुद्र’ आहे, असे विधान केले. तसेच तो ब्राह्मणांचे काम करत असल्यामुळे अडचणीत आला, असे म्हणत त्याने या गुन्ह्याचा संबंध आंबेडकरी समाजाशी जोडण्याचा प्रयत्न केला.
समाजात तीव्र संताप
या निवेदनात आरपीआयचे दौंड तालुका संघटक सतीश गायकवाड यांनी नमूद केले की, “अशोक खरात हा खुल्या प्रवर्गातील असतानाही, स्वरूपानंदने मुद्दाम त्याची जात डॉ. आंबेडकरांच्या समाजाशी जोडून समाजाची दिशाभूल केली आहे. अशा प्रकारच्या विधानामुळे आंबेडकरी व संविधानवादी जनतेच्या भावना दुखावल्या असून महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे.”
प्रशासनाला इशारा
गायकवाड यांनी पुढे म्हटले की, “एकीकडे गुन्हेगाराची प्रवृत्ती बघण्याऐवजी त्याची जात बघून समाजात विष पेरले जात आहे. तसेच विठ्ठल कांगणे यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद करणे किंवा रविराज साबळे यांना नोटीस काढणे, यांसारख्या प्रकारातून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न गृहखात्याने करू नये.”
यावेळी सतीश गायकवाड यांच्यासह ब्रह्मानंद मापारे, पोपट गडे (ज्येष्ठ सल्लागार RPI), अजय गायकवाड (सरचिटणीस), शामराव गायकवाड (सरचिटणीस बा.लो.म. संघ), कैलास शेलार, दीपक शिंदे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




