बाभुळसर बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मंदाकिनी नागवडे, उपाध्यक्षपदी अंकुश मचाले बिनविरोध

बाभुळसर बुद्रुक सेवा सहकारी संस्थेला नवे नेतृत्व; अध्यक्षपदी मंदाकिनी नागवडे, उपाध्यक्षपदी अंकुश मचाले बिनविरोध
अल्लाउद्दीन अलवी | पुणे जिल्हा प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी मंदाकिनी अंकुश नागवडे तर उपाध्यक्षपदी अंकुश दशरथ मचाले यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी धायगुडे यांनी केली.
संस्थेचे माजी अध्यक्ष संतोष नानासाहेब नागवडे तसेच उपाध्यक्ष मच्छिंद्र बाबुराव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही पदे रिक्त झाली होती. त्यानंतर संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी मंदाकिनी अंकुश नागवडे आणि उपाध्यक्षपदासाठी अंकुश दशरथ मचाले यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवड जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष मंदाकिनी नागवडे व उपाध्यक्ष अंकुश मचाले यांचा संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र नागवडे आणि विद्यमान संचालक भरत नारायण नागवडे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.
या प्रसंगी सरपंच दिपालीताई नागवडे, विद्यमान संचालक विलास बापू नागवडे, नवनिर्वाचित स्वीकृत संचालक जयवंत तात्या नागवडे, दत्तात्रय आप्पा नागवडे (मुंबईकर), माजी सरपंच गणेश मचाले, ग्रामपंचायत सदस्या मनीषा नागवडे, भीमा घोड अ‍ॅग्रो कंपनीचे अध्यक्ष संतोष नागवडे, माजी अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यासह संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सरपंच दिपाली नागवडे, अंकुश आबा नागवडे, शरद नागवडे, हरिभाऊ नागवडे, रामचंद्र आण्णा नागवडे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष संतोष नागवडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव संजय नागवडे यांनी केले. कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *