शिरूर शहरात १६ तास गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष; पेपर ब्लास्ट व मयूर रथ ठरले आकर्ष

शिरूर शहरात १६ तास गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष; पेपर ब्लास्ट व मयूर रथ ठरले आकर्षण

शिरूर प्रतिनिधी :

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा गजरात, ढोलताशांच्या निनादात, डीजेच्या दणक्यात आणि आकर्षक विद्युत रोषणाईच्या देखाव्यांनी सजलेली शिरूर शहरातील विसर्जन मिरवणूक तब्बल १६ तास रंगली. यंदा ‘पेपर ब्लास्ट’ हा अनोखा देखावा मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरला.

शिरूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत मिरवणूक शांततेत पार पाडली. पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी घाटांवर भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तर नगर परिषद मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी प्रत्येक गणेश मंडळाचा सत्कार श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केला. उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल व युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांच्या भेटींमुळे उत्साह अधिक द्विगुणित झाला.

मानाचा पहिला गणपती राममाळी शिंपी समाजाने दुपारी बाराला आरती करून मिरवणुकीची सुरुवात केली. त्यानंतर शिवसेवा मंदिर, हनुमान मंदिर मारुती आळी, विठ्ठल मंदिर कुंभार आळी आणि कामाठीपुरा येथील मानाचे गणपती पारंपरिक थाटात सहभागी झाले. यंदा श्रीमंत हलवाई गणेश मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने विद्युत रोषणाईने सजलेला भव्य मयूर रथ हा मिरवणुकीचा मुख्य आकर्षण ठरला.

शहरातील विविध मंडळांनी पारंपरिक वाद्ये, पुष्परथ, विजेच्या झगमगाटात सजवलेले मंदिररथ आणि अनोख्या मूर्ती सजावटीतून भक्तांचे लक्ष वेधले. गोपाळ गणेश मंडळाचा स्वामी समर्थ रथ, मोठी तालीम मंडळाचा भगवान महादेव रथ, पूर्वामुखी हनुमान मंडळाचा विष्णू-लक्ष्मी रथ, तर महाराणा प्रताप गणेश मंडळाची पारंपरिक पालखी या विशेष ठरल्या.

नगर परिषदेच्या वतीने रयत शाळा मैदानावर निर्माल्य संकलन व कृत्रिम हौदातील विसर्जनाची उत्तम सोय केली होती. मुख्य विसर्जन घाट शनिमंदिर येथेही भाविकांची मोठी गर्दी झाली. या उपक्रमांतून तब्बल दोन टन निर्माल्य संकलित करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *