शिरूर नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; नागरिकांना 31 ऑगस्टपर्यंत हरकती–सूचना दाखल करण्याची संधी
शिरूर (प्रतिनिधी) rjnews27marathi.com
शिरूर नगर परिषद निवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली आहे. सोमवारी (दि. 18 ऑगस्ट) नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली.
या रचनेवर नागरिकांना हरकती व सूचना नोंदविण्यासाठी 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. नगरपरिषद कार्यालयातील नोटीस बोर्ड तसेच शिरूर नगर परिषदेच्या संकेतस्थळावर ही प्रभाग रचना उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी आपली हरकत अथवा सूचना लेखी स्वरूपात नगर परिषद कार्यालयातील आवक-जावक विभागात सादर करायची आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, निर्धारित मुदतीनंतर आलेल्या हरकतीवर कोणताही विचार केला जाणार नाही. मात्र, वेळेत आलेल्या सर्व हरकतींवर स्वतंत्र सुनावणी घेऊन नागरिकांचे म्हणणे ऐकले जाईल.
नगरसेवकांची संख्या वाढणार
यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवकांची संख्या वाढवण्यात आली आहे. मागील निवडणुकीत 21 नगरसेवक होते; तर यंदा तीन जागांची वाढ होऊन एकूण 24 नगरसेवकांची निवड होणार आहे. त्यासाठी एकूण 12 प्रभागांची रचना करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडले जाणार आहेत.
आरक्षणाची सोडत प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर
प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतरच निवडणुकीतील आरक्षणाची सोडत होणार आहे. यात सर्वसाधारण, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती तसेच महिला आरक्षणाचा समावेश असेल.
नागरिकांसाठी संभाव्य प्रभाग रचनेचा नकाशा व सविस्तर सूचना नगर परिषद कार्यालयात लावण्यात आले आहेत. इच्छुकांनी त्याचा अभ्यास करून आपल्या हरकती व सूचना तातडीने दाखल कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केलें.




