बाभुळसर बुद्रुक येथे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; ४९ रक्तदात्यांनी दिले जीवनदानाचे
अल्लाउद्दीन अलवी | प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शिवजयंती उत्सव समिती व ओम दत्त केंद्र, शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
रक्तदान शिबिराच्या माध्यमातून “चला रक्तदान करूया, जीवन वाचवूया” हा सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. या आवाहनाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ४९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यामुळे गरजू रुग्णांसाठी रक्ताचा साठा उपलब्ध होण्यास मोठी मदत झाली.
स्व. अजितदादांच्या प्रतिमेचे पूजन
शिबिराच्या प्रारंभी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र आण्णा नागवडे यांच्या हस्ते दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्य, लोकसेवा आणि गरजूंच्या मदतीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे उपस्थितांनी अधोरेखित केले.
मान्यवरांची शिबिराला भेट
रक्तदान शिबिराला विविध मान्यवरांनी भेट देऊन आयोजक तसेच रक्तदात्यांचे कौतुक केले. शिरूर-हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्या सुविद्य पत्नी मनीषाताई कटके तसेच पुणे जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे यांनी शिबिराला भेट देत रक्तदात्यांचे मनोबल वाढवले.
रक्तदात्यांसाठी लकी ड्रॉचे आयोजन
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा उत्साह वाढविण्यासाठी आयोजकांच्या वतीने लकी ड्रॉ पद्धतीने आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख बाबासाहेब शिंदे यांची उपस्थिती होती.
लकी ड्रॉमध्ये प्रथम बक्षीस म्हणून ३२ इंची एलईडी टीव्ही देण्यात आला. शिरूर विक्री-खरेदी संघाचे व्हा. चेअरमन बाळासाहेब अर्जुनराव नागवडे यांच्या वतीने देण्यात आलेले हे प्रथम बक्षीस अशोक अंकुशराव मचाले यांनी पटकावले. बापूसाहेब शिंदे यांच्या हस्ते त्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले.
द्वितीय बक्षीस म्हणून दोन मिक्सर देण्यात आले. हे बक्षीस विजय सोपान नागवडे आणि सतीश भोसले यांनी पटकावले. हे बक्षीस बाळासाहेब पर्वतराव नागवडे यांच्या वतीने देण्यात आले.
तसेच तृतीय बक्षीस म्हणून फॅन देण्यात आले. यामध्ये सलीम कुरेशी, बाभुळसर बुद्रुक विकास सोसायटीचे सचिव संजय बबन नागवडे, गणेश भरत नागवडे आणि सतीश नागवडे हे विजेते ठरले.
याशिवाय लकी ड्रॉमध्ये बक्षीस न मिळालेल्या सर्व रक्तदात्यांना डिनर सेट भेट देऊन त्यांच्या सामाजिक योगदानाचा सन्मान करण्यात आला.
रक्तदात्यांचे आयोजकांकडून आभार
रक्तदान हे केवळ सामाजिक कार्य नसून एखाद्या गरजू व्यक्तीला जीवनदान देण्याचे महान कार्य आहे. बाभुळसर बुद्रुक येथे आयोजित या शिबिरातून नागरिकांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव पुन्हा एकदा दाखवून दिली. ४९ रक्तदात्यांनी रक्तदान करून “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व मान्यवर, रक्तदाते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांचे शिवजयंती उत्सव समिती व ओम दत्त केंद्र, शिरूर यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बाभुळसर बुद्रुकच्या या रक्तदान शिबिराने स्वातंत्र्य दिनाचा उत्सव केवळ देशभक्तीपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक संवेदना आणि माणुसकीचा संदेश देत तो अधिक अर्थपूर्ण केला.




