बाभुळसर बुद्रुक येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर घोषणांनी गावठाण परिसर दुमदुमला
अल्लाउद्दीन अलवी | प्रतिनिधी

बाभुळसर बुद्रुक, ता. शिरूर : बाभुळसर बुद्रुक येथे ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत प्रशासक दिपालीताई महेंद्र नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसराची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात आल्याने पंचायत कार्यालयासह संपूर्ण परिसराने स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला आकर्षक रूप प्राप्त झाले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभुळसर बुद्रुक (केंद्र शाळा तांदळी) येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी ‘जय जवान, जय किसान’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशा घोषणांनी गावठाण परिसर दुमदुमून टाकला. तसेच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि देशप्रेमाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांमध्ये जनजागृती केलस्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे सादर केली. देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले असून त्यांच्या योगदानाची आठवण ठेवणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
मंथन व स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

बाभुळसर बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मंथन व शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर घवघवीत यश संपादन करून शाळेचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रमातील मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे उपस्थितांनी कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सरपंच दिपालीताई नागवडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी विविध प्रकारची कामे करण्यात आली आहेत. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
शाळेच्या विकासामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप नारायण नागवडे, मुख्याध्यापक अडसूळ सर, सर्व शिक्षक, पालक सदस्य आणि ग्रामस्थांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शाळेच्या यशामुळे गावाच्या वैभवात भर
घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र आण्णा नागवडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्याध्यापक अडसूळ सर, शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचे अभिनंदन केले. मंथन व शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे निश्चितच कौतुकास्पद असून या यशामुळे बाभुळसर बुद्रुक गावाचे नाव राज्याच्या शैक्षणिक पटलावर पोहोचले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा देण्यासाठी शिक्षक व पालकांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोथिंबिरे सर यांनी केले. तर शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवर, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष काका नागवडे यांनी आभार मानले.
देशभक्ती, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव अशा विविध उपक्रमांनी बाभुळसर बुद्रुक येथील स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.




