मनसर येथे नारीशक्ती महिला मंडळात स्वातंत्र्यदिन उत्साहात; तिरंग्याला मानवंदना
प्रतिनिधी – ज्योती यादव
मनसर (ता. रामटेक) : येथील नारीशक्ती महिला मंडळाच्या कार्यालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वज तिरंगा फडकावून त्याला मानवंदना देण्यात आली. महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांसह गावातील नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त उपस्थिती लावली.
नारीशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्योती ताई यादव यांच्या हस्ते सकाळी ठीक ७.३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी सामूहिकरित्या राष्ट्रगीत ‘जन गण मन’ गायले. यावेळी भारतमातेचा जयघोष करत तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान अध्यक्षा ज्योती ताई यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना देशाच्या विकासात महिला, युवक आणि विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग व बलिदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच देशाला विकसित भारताच्या दिशेने पुढे नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी महिला मंडळाच्या सदस्यांनी देशभक्तीपर गीते व मनोगते सादर करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. उपस्थित मान्यवर व महिला सदस्यांनी मंडळाच्या अध्यक्षा ज्योती ताई यादव यांचे स्वागत केले.
कार्यक्रमास अनिशा पासवान, वैशाली फुलझले, रेखा जांभुळे (कार्यालय प्रमुख), अनामिका भन्नारे, वंदना ताई भिसेन, राधा यादव, पौर्णिमा भोयर, पदमा रंगवार यांच्यासह नारीशक्ती महिला मंडळाच्या सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता उपस्थितांना मिठाई वाटप करून करण्यात आली. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. संपूर्ण कार्यक्रमातून देशभक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
— ज्योती यादव




