रांजणगाव गणपती प्रतिनिधी- विवेकानंद फंड
विनायकी चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त महागणपती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने महागणपतीचे दर्शन घेत धार्मिक विधींमध्ये सहभाग नोंदविला.
विनायकी चतुर्थीनिमित्त पहाटे ५ वाजता महागणपतीचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी ७ वाजता गणेश याग पार पडला. सकाळी १० वाजता सत्यविनायक पूजा संपन्न झाली. दुपारी १२ वाजता विनायकी चतुर्थीनिमित्त महागणपतीची मुख्य महापूजा देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार नितीन देव यांच्या हस्ते विधिवत पार पडली.
यावेळी महागणपतीस देवस्थानचे मुख्य विश्वस्त कै. वसंतराव मोरेश्वर देव यांच्या प्रित्यर्थ तब्बल १००१ अननसांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली होती. फुलांच्या सजावटीमुळे मंदिराचा गाभारा अधिकच सुंदर व प्रसन्न दिसत होता.
विनायकी चतुर्थीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात दिवसभर भक्तीमय वातावरण होते. विविध ठिकाणांहून आलेल्या भाविकांनी महागणपतीचे दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन व व्यवस्था करण्यात आली.
याबाबतची माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. स्वातीताई पाचुंदकर पाटील यांनी दिली.
यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर पाटील, खजिनदार विजय देव, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पांडुरंग चोरगे, हिशोबणीस संतोष रणपिसे, जनसंपर्क अधिकारी रमाकांत शेळके यांच्यासह देवस्थानचे कर्मचारी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.




