क्रांतिकारक समशेर भोसले यांच्या जयंतीनिमित्त मांडवगण फराटा येथे अभिवादन; आदिवासी समाजाच्या प्रगतीचा गौरव
मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे |
प्रतिनिधी – अल्लाउद्दीन अलवी
मांडवगण फराटा येथे आदिवासी समाजातील क्रांतिकारक समशेर भोसले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. येथील पुण्याई मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात क्रांतिकारक समशेर भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय फराटे, मांडवगण फराटा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक खंडेराव आण्णा फराटे आणि संचालक कैलास तात्या फराटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी क्रांतिकारक समशेर भोसले यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. आदिवासी समाजाच्या इतिहासातील योगदानाची जाणीव पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे तसेच समाजातील युवकांनी शिक्षण, सामाजिक प्रगती आणि विकासाच्या प्रवाहात पुढे यावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना दत्तात्रय आबा फराटे म्हणाले की, मांडवगण फराटा गावातील आदिवासी समाज हा कष्टाळू आणि जिद्दी समाज म्हणून ओळखला जातो. बदलत्या काळानुसार समाजाने शिक्षणाला महत्त्व दिले असून अनेक पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षण देत आहेत. त्यामुळे समाजातील अनेक युवक-युवती विविध उच्च पदांवर कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण आणि सामाजिक एकजुटीच्या माध्यमातून आदिवासी समाजाची मोठ्या प्रमाणात प्रगती होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला पत्रकार राजेंद्र कांबळे, अध्यक्ष पलांडे भोसले, पोलीस भोसले, कपिल भोसले, महेंद्र भोसले, लुच्चा भोसले, योगेश भोसले, विशाल भोसले, लहू भोसले, अभिनंदन भोसले, सुहास भोसले, चेतन भोसले, सतीश भोसले, सारंग भोसले, अक्षय काळे, आकाश काळे, महेश भोसले, हरि भोसले, श्रीराम भोसले यांच्यासह आदिवासी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंतीनिमित्त झालेल्या या कार्यक्रमातून क्रांतिकारक समशेर भोसले यांच्या स्मृतींना अभिवादन करत आदिवासी समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीचा सकारात्मक संदेश देण्यात आला.




