भैरवनाथ विद्यालयाचा गौरव; युवा अभिनेता अनोश ठोंबे यांचा उत्स्फूर्त सत्कार

नागरगाव प्रतिनिधी : विजय कांबळे

नागरगाव : खुटबाव येथील भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची परंपरा कायम राखत युवा अभिनेता अनोश राजू ठोंबे यांच्या यशस्वी कलाप्रवासाचा विद्यालयाच्या वतीने उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला. अभिनय क्षेत्रात आपल्या मेहनतीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अनोश यांच्या यशाचा गौरव शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केला. यावेळी अनोश यांच्या मातोश्री अर्चना ठोंबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य विनायक कांबळे, पर्यवेक्षक सूर्यवंशी सर, तसेच कदम सर, दहिफळे सर, रुपनवर सर, पवार सर, ठोंबे सर, थोरात बी. जे. सर, थोरात एच. जे. सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अनोश ठोंबे यांचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान केला. या सत्कारामुळे विद्यालयाच्या परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपनवर सर यांनी केले. यावेळी प्राचार्य विनायक कांबळे, पवार सर, सूर्यवंशी सर व कदम सर यांनी अनोश ठोंबे यांच्या कलाक्षेत्रातील वाटचालीचे कौतुक करत त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आपल्या विद्यालयातील विद्यार्थी अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचा विद्यालयाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वामी समर्थ’ मालिकेतील ‘शिवा’ भूमिकेचा उलगडला प्रवास

सत्कारानंतर अनोश ठोंबे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाविषयी अनुभव कथन केले. विविध वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये काम करताना आलेले अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. विशेषतः ‘स्वामी समर्थ’ मालिकेतील ‘शिवा’ ही भूमिका मिळण्यामागील प्रवास, त्यासाठी केलेली तयारी आणि अभिनय क्षेत्रात संधी मिळविण्यासाठी घेतलेली मेहनत याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

“सातत्य, मेहनत, संयम आणि आपल्या ध्येयावर विश्वास ठेवला, तर आयुष्यात संधी नक्की मिळते,” असा प्रेरणादायी संदेश अनोश ठोंबे यांनी विद्यार्थ्यांना दिला. आपल्या यशामागे आई-वडिलांसह शिक्षकांचेही मोठे योगदान असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे मेहनत घेऊन ध्येय निश्चित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आईच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू

मुलाच्या कलाक्षेत्रातील यशाची दखल घेत विद्यालयाने केलेल्या सत्काराबद्दल अर्चना ठोंबे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या मुलाचा शाळेने केलेला गौरव हा कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाचा आणि अविस्मरणीय क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यालय प्रशासन, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

विद्यालयाच्या वतीने झालेल्या या सन्मानाबद्दल अनोश ठोंबे यांनीही प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले. आपल्या शाळेने केलेला हा गौरव आयुष्यभर स्मरणात राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना अभिनय क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव ऐकण्याची संधी मिळाली. अनोश ठोंबे यांचा कलाप्रवास आणि त्यांनी दिलेला प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी दहिफळे सर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *