आशा सेविकांच्या कार्याचा गौरव; संवाद पुनर्वसन केंद्रात सत्कार समारंभ उत्साहात संपन्न
केंदूर प्रतिनिधी : कीर्ती साकोरे

कोरेगाव भीमा : ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा म्हणून अहोरात्र कार्यरत असलेल्या आशा सेविकांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी मनोब्रम्हा फाउंडेशन व संवाद पुनर्वसन केंद्र, वाडेगाव फाटा, कोरेगाव भीमा यांच्या वतीने बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष सत्कार समारंभ व संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला.

डॉ. किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ३५ ते ४० आशा सेविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गटप्रमुख सौ. सारिका आनंद रत्नपारखी व सौ. वैजयंती सुहास केंदुरकर यांच्या उपस्थितीत आशा सेविकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान मानसिक आरोग्य, मानसिक आजारांची कारणे, व्यसनाधीनतेमागील मानसिक, सामाजिक व कौटुंबिक घटक, व्यसनाधीन व्यक्ती तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी प्रभावी संवाद साधण्याची पद्धत आणि योग्य समुपदेशनाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
व्यसनमुक्ती तज्ज्ञ व मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. किरण चव्हाण यांनी आशा सेविकांशी संवाद साधताना ग्रामीण भागातील आरोग्यसेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्यात आशा सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. व्यसनाधीन व्यक्तीकडे केवळ दोषी व्यक्ती म्हणून न पाहता त्यामागील मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींना वेळेत समुपदेशन, उपचार आणि पुनर्वसनाची दिशा मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“आशा सेविका या केवळ आरोग्य विभागाच्या कार्यकर्त्या नसून ग्रामीण आरोग्यव्यवस्थेच्या पायाभूत आधारस्तंभ आहेत. कुटुंब आणि आरोग्य यंत्रणा यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून त्या सातत्याने काम करतात,” अशा शब्दांत यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन, बालकांचे आरोग्य, लसीकरण, कुटुंब कल्याण, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती, शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच गरजू रुग्णांना योग्य आरोग्यसेवेशी जोडणे, अशा विविध जबाबदाऱ्या आशा सेविका प्रभावीपणे पार पाडत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
विशेषतः मानसिक आरोग्य व व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात आशा सेविकांची भूमिका अधिक प्रभावी ठरू शकते. गावातील कुटुंबांशी त्यांचा सातत्याने संपर्क असल्याने मानसिक त्रासाची प्राथमिक लक्षणे ओळखणे, व्यसनाधीन व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांना योग्य मार्गदर्शन करणे आणि गरज भासल्यास संबंधित व्यक्तीला तज्ज्ञांकडे संदर्भित करणे यासाठी आशा सेविकांना सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुप्रिया चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन पायल डोळस मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन हेमंत कुमार मुळे व महादेव माने यांनी केले. संवाद पुनर्वसन केंद्रातील कर्मचारी वर्गाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी “मानसिकदृष्ट्या निरोगी, व्यसनमुक्त आणि संवेदनशील समाज घडविण्यासाठी आरोग्य विभाग, सामाजिक संस्था, कुटुंब आणि समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे,” असा संदेश दिला.
आशा सेविकांच्या दैनंदिन कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान केल्याबद्दल उपस्थित आशा सेविकांनी मनोब्रम्हा फाउंडेशन व संवाद पुनर्वसन केंद्राचे आभार मानले. आरोग्यसेवेबरोबरच मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्तीबाबत मिळालेले मार्गदर्शन ग्रामीण भागात काम करताना निश्चितच उपयुक्त ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आशा सेविकांच्या कार्याचा सन्मान, मानसिक आरोग्याबाबत जनजागृती आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.




