पिंपळसुटी-हंगेवाडी बंधारा वाहतुकीसाठी धोकादायक; आमदार माऊली आबा कटके यांच्या तातडीच्या सूचनेनंतर दुरुस्तीला गती

पिंपळसुटी-हंगेवाडी बंधारा वाहतुकीसाठी धोकादायक; आमदार माऊली आबा कटके यांच्या तातडीच्या सूचनेनंतर दुरुस्तीला गती

 

पिंपळसुटी, ता. शिरूर, दि. ९ (प्रतिनिधी अल्लाउद्दीन अलवी) : शिरूर-श्रीगोंदा तालुक्यांतील शेतीसाठी महत्त्वाचा असलेल्या पिंपळसुटी-हंगेवाडी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा सध्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. बंधाऱ्याला आवश्यक ठिकाणी कठडे नसल्याने वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, बंधाऱ्याच्या साईडचा भरावही वाहून गेल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.

 

या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी शिरूर-हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्याकडे निवेदन देऊन बंधाऱ्याची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या मागणीची तत्काळ दखल घेत आमदार कटके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बंधाऱ्याची पाहणी करून आवश्यक त्या दुरुस्तीच्या सूचना दिल्या.

 

त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्नेहा पवार, कनिष्ठ अभियंता तुषार दिवसे आणि सहाय्यक अभियंता महेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी बंधाऱ्याची सद्यस्थिती, वाहून गेलेला साईडचा भराव तसेच कठड्यांचा अभाव याबाबत पाहणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याची आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्यात येईल, असे ग्रामस्थांना सांगितले.

 

पिंपळसुटी-हंगेवाडी येथील हा बंधारा परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, त्याच्या माध्यमातून शेतीसाठी पाण्याचा उपयोग होतो. त्यामुळे बंधाऱ्याची सुरक्षितता आणि दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

 

दरम्यान, शिरूर व श्रीगोंदा तालुक्यांतील शेतीला पाणी मिळण्यासाठी घोडच्या उजव्या कालव्याचे ओव्हरफ्लोचे पाणी सुरू ठेवण्याबाबतही आमदार माऊली आबा कटके यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती पिंपळसुटी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब खळदकर यांनी दिली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

 

यावेळी पिंपळसुटी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब खळदकर, सरपंच सुनील फलके, जनार्दन मोहिते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *