दौंड, प्रतिनिधी : विकास साळुंक
दौंड–पुणे रेल्वे मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन या मार्गावर नियमित लोकल तसेच डेमो (DEMU) रेल्वे सेवा सुरू करण्याची महत्त्वपूर्ण मागणी आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली. यावेळी झालेल्या बैठकीत या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
दौंड–पुणे रेल्वे मार्ग हा राज्यातील अत्यंत वर्दळीच्या मार्गांपैकी एक मानला जातो. या मार्गावर दररोज हजारो विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, शासकीय कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिक प्रवास करतात. मात्र उपलब्ध रेल्वे गाड्यांवर वाढता प्रवासी ताण, गर्दी आणि मर्यादित फेऱ्यांमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन या मार्गावर लोकल आणि डेमो सेवा सुरू करण्याची गरज आमदार कुल यांनी बैठकीत ठळकपणे मांडली.
बैठकीदरम्यान केवळ नवीन सेवा सुरू करण्याची मागणीच नव्हे, तर विद्यमान रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ करणे, प्रवाशांच्या सोयीसाठी वेळापत्रकात आवश्यक बदल करणे, स्थानकांवरील मूलभूत सुविधांचा विस्तार करणे आणि वाढत्या प्रवासी संख्येनुसार रेल्वे व्यवस्थेत सुधारणा करण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
या सर्व मागण्यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक दखल घेत संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले. त्यामुळे दौंड–पुणे रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या अपेक्षांना नवी आशा मिळाली आहे.
दौंड–पुणे मार्गावर लोकल आणि डेमो रेल्वे सेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार असून सुरक्षित, जलद आणि किफायतशीर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. याचा थेट लाभ विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच ग्रामीण भागातून पुण्याकडे ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांना होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
या सकारात्मक चर्चेनंतर आता रेल्वे मंत्रालयाच्या अंतिम निर्णयाकडे दौंड तालुक्यासह संपूर्ण परिसरातील नागरिक, प्रवासी संघटना आणि विविध सामाजिक संस्थांचे लक्ष लागले असून, लवकरच या मागणीवर ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




