यवत पोलिसांचा अवैध दारू माफियांवर धडक प्रहार; एकाच दिवशी सहा गुन्हे, ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

यवत, ता. ३ (प्रतिनिधी : योगेश राऊत) :

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनने अवैध दारू व्यवसायाविरोधात मोठी धडक मोहीम राबवत एकाच दिवशी सहा स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे ८५ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात गावठी हातभट्टी दारू, देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या, हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन यांचा समावेश आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक तसेच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत २ ऑगस्ट रोजी यवत पोलीस स्टेशनच्या पथकाने नांदूर, यवत, कानगाव आणि डुबेवाडी परिसरात एकाचवेळी नियोजनबद्ध छापेमारी करत अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.

कारवाईदरम्यान नांदूर येथील धरता रामानंद गुडदावत याच्याकडून ३१५ लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. यवत येथील हॉटेल कोल्हापूर तडका परिसरात शिवाजी शहाजी भोसले याच्याकडून विविध ब्रँडच्या देशी व विदेशी मद्याच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.

तसेच कानगाव येथील सत्यजित रविंद्र कांबळे याच्याकडून २३ बाटल्या देशी मद्य जप्त करण्यात आले. डुबेवाडी येथील अंकुश नरबत्या गुडदावत याच्याकडून हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारी भट्टी, लोखंडी बॅरल आणि सुमारे एक हजार लिटर कच्चे रसायन जप्त करण्यात आले. याशिवाय कानगाव येथील बाळासाहेब उत्तमराव अडागळे व नितीन एकनाथ फडके यांच्याकडूनही विविध प्रकारच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

या सर्व प्रकरणांमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत सहा स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले असून संबंधित आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यवत पोलीस प्रशासनाने अवैध दारू निर्मिती, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा बेकायदेशीर व्यवसायांना आळा घालण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेत आपल्या परिसरात अवैध दारू विक्री किंवा हातभट्टी दारू निर्मिती सुरू असल्याची माहिती तात्काळ यवत पोलीस स्टेशनला द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, या धडक कारवाईमुळे यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याने बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *