शिरूर : विजय कांबळे
शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे महावितरण कंपनीच्या मालकीच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत ट्रान्सफॉर्मरचे नुकसान करत सुमारे ४८ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला असून, शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुरज शंकर लोहार (वय ३०, रा. पारगाव, ता. दौंड, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, २२ जुलै २०२६ रोजी रात्री १० वाजल्यापासून ते २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजेच्या दरम्यान नागरगाव गावाच्या हद्दीतील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मालकीचा १००/२२ केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर (डी.टी.सी. क्र. ४०५५५२५) अज्ञात चोरट्याने पोलवरून खाली पाडला.
यानंतर ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल सांडून त्याचे नुकसान करण्यात आले. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे ८० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेण्यात आल्या. या चोरीमुळे महावितरणचे अंदाजे ४८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी २४ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.४६ वाजता शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत कोणतेही वाहन किंवा हत्यार वापरल्याची नोंद नसून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार गवळी करीत असून, ट्रान्सफॉर्मरची चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध शिरूर पोलीस घेत आहेत. महावितरणच्या वीज यंत्रणेला लक्ष्य करणाऱ्या अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.




