मांडवगण फराटा, प्रतिनिधी : रमेश बनसोडे,
मांडवगण फराटा येथील हॉटेल व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते हरीमामा फराटे यांच्या व्यापारी संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांची पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे मांडवगण फराटा परिसरासह शिरूर तालुक्यातील व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुण्यातील सहकारनगर, पर्वती येथील सातव हॉल येथे नुकताच पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ दिनकर निवंगुणे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
हरीमामा फराटे यांनी व्यापाऱ्यांच्या विविध समस्या, संघटनात्मक बळकटी, व्यापाऱ्यांचे हक्क, स्थानिक प्रश्न तसेच व्यापारी हिताच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत संघटनेने यापूर्वी त्यांच्यावर तालुका उपाध्यक्ष, तालुका कार्याध्यक्ष, जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा सचिव अशी विविध जबाबदारी सोपविली होती. प्रत्येक पदावर त्यांनी प्रभावीपणे काम करत संघटनेचा विस्तार आणि व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले.
त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत यापूर्वी त्यांना पुणे जिल्हा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यंदा त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, या माध्यमातून जिल्हाभरातील व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विकास मुंदडा, पुणे शहराध्यक्ष रामभाऊ दोडके, जिल्हा जनरल सेक्रेटरी नवनाथ सोमसे, संघटन मंत्री अजितजी चंगेडिया, मुख्य संपर्क प्रमुख संतोष राऊत, सहसचिव दत्ताभाऊ जाधव, पुणे शहर जनरल सेक्रेटरी रिजवान खान, महिला जिल्हा व शहर अध्यक्षा वैशालीताई माळी, अश्विनी खांडेकर, वर्षा पवार, वर्षा कानिटकर, भावनाताई थोरात, संगीताताई पाटणे, ज्ञानेश्वर पवार, पांडुरंग आण्णा फराटे यांच्यासह संघटनेचे शेकडो नवनिर्वाचित पदाधिकारी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नियुक्तीनंतर बोलताना हरीमामा फराटे यांनी, “व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविणे, संघटना अधिक मजबूत करणे आणि व्यापारी हितासाठी सातत्याने कार्य करणे हेच माझे ध्येय राहील. संघटनेने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करेन,” अशी भावना व्यक्त केली.




