प्रतिनिधी | गणेगाव दुमाला (ता. शिरूर)
गणेगाव दुमाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब समोर आल्यानंतर स्थानिक स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्याला यश मिळत शाळेत नवीन शिक्षकांची कायमस्वरूपी भरती होईपर्यंत अनिल जगताप यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी शाळेत हजेरी लावली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार मा. माऊली आबा कटके यांच्या माध्यमातून तसेच ऋषिकेश राजेंद्र निंबाळकर (सरचिटणीस, शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस तथा अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ, जि.प. शाळा गणेगाव दुमाला) यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हा प्रश्न तात्पुरता मार्गी लागला.
या प्रक्रियेत गटविकास अधिकारी डोके साहेब, गटशिक्षणाधिकारी प्रीतम कोकणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश दादा निंबाळकर, मुख्याध्यापक विकास काळे तसेच वर्गशिक्षक कुंभार सर यांनीही समन्वय साधत आवश्यक कार्यवाही केली. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनात सातत्य राहणार असून शाळेचे नियमित शैक्षणिक कामकाज सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, गणेगाव दुमाला ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि माजी विद्यार्थी संघाच्या वतीने शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि संबंधितांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच शाळेसाठी लवकरात लवकर कायमस्वरूपी शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.




