पाटसमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १० एकर जागा मंजूर
आमदार अॅड. राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश; शेतकरी व व्यापाऱ्यांना मिळणार अत्याधुनिक बाजार आवार
प्रतिनिधी – योगेश राऊत
पाटस, ता. दौंड : दौंड तालुक्यातील शेतकरी आणि व्यापारी वर्गासाठी महत्त्वाचा ठरणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, पाटस येथील १० एकर शासकीय गायरान जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती, दौंड यांना बाजार आवार उभारण्यासाठी मंजूर करण्यात आली आहे. आमदार अॅड. राहुल कुल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे.
महसूल व वन विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन ज्ञापन जारी केले आहे. त्यानुसार मौजे पाटस (ता. दौंड) येथील गट क्रमांक ८९० मधील १० एकर गायरान जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीला सार्वजनिक प्रयोजनासाठी केवळ नाममात्र एक रुपया दराने कब्जेहक्काने देण्यास शासनाने पूर्वमंजुरी दिली आहे.
पाटस परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी स्वतंत्र, प्रशस्त आणि अत्याधुनिक सुविधा असलेले बाजार आवार उपलब्ध व्हावे, यासाठी आमदार अॅड. राहुल कुल यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत ही जमीन पणन संचालक, पुणे यांच्या नावावर ‘भोगवटादार वर्ग-२’ या स्वरूपात मंजूर करण्यात आली आहे. शासनाच्या अटींनुसार या जागेवर पुढील तीन वर्षांच्या आत बाजार आवाराचे काम सुरू करणे बंधनकारक असणार आहे.
या निर्णयामुळे पाटससह परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होणार असून, व्यापाऱ्यांनाही एकाच ठिकाणी व्यवहार करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे. भविष्यात कृषी मालाची खरेदी-विक्री अधिक सुलभ होऊन बाजारपेठेचा विस्तार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हा निर्णय झाल्यानंतर आमदार अॅड. राहुल कुल यांनी समाधान व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले. शेतकरी हिताच्या या निर्णयामुळे दौंड तालुक्याच्या कृषी विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चौकट
“शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड”
“पाटस आणि परिसरातील शेतकरी बांधवांसाठी हे नवीन बाजार आवार निश्चितच मैलाचा दगड ठरेल. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ आणि योग्य भाव मिळण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. आमच्या मागणीची तातडीने दखल घेऊन जमीन मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे.”
— आमदार अॅड. राहुल कुल, दौंड विधानसभा मतदारसंघ




