राज्य मंडळाच्या महत्त्वाच्या समितीवर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांची नियुक्ती

राज्य मंडळाच्या महत्त्वाच्या समितीवर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांची नियुक्ती.

 

नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी “मंडळ अधिनियम व मंडळ नियमावली दुरुस्ती समिती”वर सदस्य म्हणून निवड

 

प्रतिनिधी : विजय कांबळे 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन शैक्षणिक धोरण (NEP) प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने विविध महत्त्वाच्या समित्यांची पुनर्रचना केली असून, जेजुरी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य तथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव प्राचार्य नंदकुमार सागर यांची “मंडळ अधिनियम व मंडळ नियमावली दुरुस्ती समिती”च्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, परीक्षा पद्धतीतील आवश्यक सुधारणा, तसेच मंडळाच्या अधिनियम आणि नियमावलीत काळानुरूप बदल करण्यासाठी विविध तज्ज्ञ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांवर शिक्षण क्षेत्रातील अनुभवी, अभ्यासू आणि प्रशासकीय कौशल्य असलेल्या व्यक्तींना संधी देण्यात आली आहे.

प्राचार्य नंदकुमार सागर यांनी मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्नांवर सातत्याने प्रभावी भूमिका बजावत राज्यभरात आपला ठसा उमटविला आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, संघटनात्मक नेतृत्व आणि शैक्षणिक धोरणांचा सखोल अभ्यास यामुळे राज्य मंडळाच्या निर्णयप्रक्रियेला निश्चितच दिशा मिळेल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

या नियुक्तीचे राज्यभरातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षणप्रेमी तसेच विविध शैक्षणिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. प्राचार्य सागर यांच्या माध्यमातून शालेय शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि विद्यार्थीहिताचे सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

प्राचार्य नंदकुमार सागर यांची ही नियुक्ती जेजुरी, पुरंदर तालुका तसेच पुणे जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात असून, राज्याच्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *