दौंड तालुक्यात जमीन वादातून महिलेला जीवे मारण्याची धमकी; शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

 

प्रतिनिधी – विकास साळुंके 

दौंड तालुक्यातील आलेगाव परिसरात जमीन वादातून एका महिलेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आलेगाव येथील रहिवासी असलेल्या एका महिलेच्या मालकीच्या शेतजमिनीवरून हा वाद उद्भवला. घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास आरोपी व्यक्ती काही मजुरांसह संबंधित शेतजमिनीवर ऊस लागवडीसाठी आला होता. त्यावेळी महिलेच्या वडिलांनी ही जमीन त्यांच्या मुलीच्या मालकीची असल्याचे सांगून लागवड न करण्यास सांगितले.

यावरून आरोपी संतप्त झाला आणि त्याने संबंधित कुटुंबीयांना धमकावत, स्वतःवर पूर्वी गंभीर गुन्हा दाखल असल्याचा उल्लेख करत पुन्हा जीवघेणी कारवाई करण्याची भाषा केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच आरोपीकडे लोखंडी कोयता असल्याची आणि त्यासह फोटो सोशल मीडियावर ठेवल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

या घटनेनंतर संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *