चासकमान डावा कालवा अस्तरीकरणाविरोधात मुखईत शेतकऱ्यांचा एल्गार; रास्ता रोको आंदोलनाने प्रशासनाचे वेधले लक्ष

मुखई येथे चासकमान डावा कालवा अस्तरीकरणाविरोधात रास्ता रोको आंदोलन

मुखई, ता. शिरूर (प्रतिनिधी) अंकुश घारे 

– चासकमान डावा कालवा अस्तरीकरणाच्या प्रस्तावित कामाविरोधात मुखई येथे शेतकरी व ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात मुखईसह धामारी, पिंपळे खालसा, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, खैरेवाडी आणि परिसरातील गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

 

 

 

 

शेतकऱ्यांच्या मते, चासकमान डावा कालवा हा केवळ सिंचनाचा स्रोत नसून परिसरातील भूजल पातळी टिकवून ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कालव्यातून झिरपणाऱ्या पाण्यामुळे विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांना नैसर्गिकरित्या पाणी उपलब्ध होते. मात्र कालव्याचे अस्तरीकरण झाल्यास झिरपण थांबून भूजल पातळी खालावण्याचा धोका निर्माण होईल. परिणामी अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडू शकतात आणि शेतीसाठी आवश्यक पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी शासन आणि संबंधित विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत अस्तरीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. “शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न करता घेतलेला हा निर्णय आम्हाला मान्य नाही,” अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. जोपर्यंत अस्तरीकरणाचा प्रस्ताव मागे घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांच्या भावना व मागण्या वरिष्ठ स्तरावर पोहोचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची तीव्रता काहीशी कमी झाली. मात्र शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहून योग्य निर्णय न झाल्यास पुढील काळात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी शिरूर तालुक्याचे माजी आमदार काकासाहेब पलांडे यांच्यासह विविध गावांतील शेतकरी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनामुळे चासकमान कालवा अस्तरीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *