तांत्रिक विश्लेषणाच्या बळावर सुपा पोलिसांची मोठी कामगिरी; अपहरण प्रकरणाचा काही तासांत उलगडा

, प्रतिनिधी :Rjnews 27 मराठी 

सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका अपहरण प्रकरणाचा अवघ्या काही तासांत यशस्वी छडा लावत पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली. वेगवान हालचाली, तांत्रिक तपास आणि विविध पोलीस ठाण्यांच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वी ठरली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दि. ७ जून रोजी दंडवाडी (ता. बारामती) येथील ऋषिकेश विजय चांदगुडे याचे अपहरण झाल्याची माहिती सुपा पोलिसांना मिळाली. प्राथमिक माहितीनुसार, लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून काही संशयितांनी त्याला जबरदस्तीने घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. जेजुरी, सासवड, उरुळीकांचन आणि यवत परिसरात नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, तांत्रिक तपासाद्वारे संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार संशयित दिवेघाट परिसरात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग तीव्र केला.

सासवड पोलिसांच्या सहकार्याने झेंडेवाडी (ता. पुरंदर) परिसरात संशयित वाहनाला अडविण्यात आले. वाहनातील संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर अपहरण झालेल्या तरुणाचा शोध घेण्यात आला आणि त्याची सुरक्षित सुटका करण्यात पोलिसांना यश आले.

या कारवाईमुळे अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा किती सतर्क आणि सक्षम आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक माहिती संकलित केली जात आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *